मुंबईत गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस

मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली. सांताक्रुझ वेधशाळेत नोंद झालेला गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार आज सकाळी साडे ८ पर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २६७ मिलिमीटर पाऊस झाला. यापूर्वी २ जुलै २०१९ रोजी ३७५ आणि १५ जुलै २००९ रोजी २७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरात काही ठिकाणी मध्यरात्री १ ते सकाळी ७ दरम्यान सुमारे ३०० मिलीमीटर पाऊस झाला.  

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली होती. सकाळी बराच वेळ मध्य रेल्वेवरच्या जलद लोकल बंद होत्या. कुर्ला ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावरची सेवाही दुपारपर्यंत बंद होती. पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू होती. यामुळं सर्व मार्गावरच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या. सध्या लोकल सेवा उशिरानं सुरू आहेत. मुंबईतल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं बेस्टनं १७ ठिकाणांहून जाणाऱ्या बसच्या मार्गांमध्ये बदल केले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं पनवेल-दादर, पनवेल-वाशी मार्गावर बसची व्यवस्था केली होती. याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सोडल्या. 

रेल्वेनं नाशिक आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लघु पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळं अप-डाऊन करणाऱ्यांची गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या मुंबईत उशिरा पोहोचल्या. त्यामुळं १५ गाड्या उशिरा सुटणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. 

मध्यरात्री पासूनच जोरदार पाऊस असल्यानं पालिकेनं मुंबईतल्या शाळांना सुटी जाहीर केली होती. राज्य सरकारनं कार्यालयं लवकर सोडण्याचे आदेश दुपारी जारी केले.