शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मितीचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावे. त्यासाठी माहितीपूर्ण आणि संयमाने निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कंपन्यांनी पारदर्शकता, व्यवस्थापनात व्यावसायिकता ठेवावी, नियामकांनी तत्पर रहावे आणि बाजारांनी गुंतवणूकदार केंद्री सुधारणा कराव्या असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या नागरिकांच्या वित्तीय सक्षमीकरणासाठी सरकार कटीबद्ध आहे. वित्तीय यंत्रणेच्या वृद्धीच्या प्रक्रियेत सर्वांना सहभागी होण्याची आणि विकासाची संधी दिली जाईल. त्यात उत्पन्न, राहण्याचे ठिकाण किंवा लिंग या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाणार नसल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली. देशातल्या गुंतवणूकदारांचं सरासरी वय ३२ असून त्यातले ४० टक्के तिशीच्या आतले आहेत आणि एक चतुर्थांश महिला असल्याचं त्या म्हणाल्या. १ लाख कोटी पेक्षा अधिक बाजार भांडवल असलेली केवळ एक कंपनी २००० साली होती. कोरोनापूर्वी हे प्रमाण ३० होते आणि आता त्यांची संख्या ८१ पर्यंत वाढल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबुती, सुधारणांची अंमलबजावणी आणि सातत्याने वाढणारे गुंतवणूकदार यामुळेच हे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं.