संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय लष्कराकडे आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संमेलनात बोलताना, कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भारताची भूमिका अधोरेखित केली.
काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत, तर काही देशांना या नियमांवर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. अशा परिस्थितीत नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ठेवण्यावर भारताचा भर आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. शांतिसेनेतलं भारताचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं आणि भारताच्या मते शांतिसेनेचं यश हे आकडेवारीवर नाही, तर त्यांच्या सुसज्जतेवर ठरतं, असं ते म्हणाले.
शांतिसेनेत योगदान देणाऱ्या देशांनी त्यांच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून घेणं, सैन्यदलं तातडीनं तैनात करण्याची क्षमता वाढवणं आणि आपापसांतलं सहकार्य बळकट करणं यावर भर देण्याची गरज लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यावेळी अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांच्या एकंदर ७१ शांतता मोहिमांपैकी ५१ मोहिमांमध्ये भारताच्या तीन लाख महिला आणि पुरुष जवानांनी योगदान दिल्याची माहिती त्यांनी दिली.