पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.
या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल.
या हल्ल्यात जखमी झालेले राज्यातले चार पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचं दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्राने कळवलं आहे. तसंच, जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत ३०८ पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.
मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.
जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे.