देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम आहे. तर उत्तरेकडच्या काही भागात बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमी वाऱ्यांच्या संघर्षामुळे वावटळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
राजधानी दिल्लीत आज सकाळी वादळी वारे आणि पावसामुळे एक झाड कोसळून एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला. द्वारका इथं खाराखरी नाहर गावात झालेल्या या दुर्घटनेत एक महिला तिच्या तीन मुलांसह मरण पावली, तर तिचा पती जखमी झाला. दक्षिण दिल्लीतल्या जाफरपूर कलान इथं एका घरावर झाड कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. छावला इथंही घराचे छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पण त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.
मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. तर सखल भागात पाणी साचलं होतं. विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सकाळी पाणी साचलेल्या मजनू का टीला या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली.
मध्य प्रदेशात गेल्या सहा दिवसांपासून काही ठिकाणी प्रचंड उष्णता आहे, तर काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि ५ जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात अनेक भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे.
येत्या २ ते ५ मे दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस तर ६ ते ८ मे पर्यंत. राज्याच्या अनेक भागात मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस तसंच गारपीट होण्याची शक्यता आहे, या काळात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं हिमाचल प्रदेशाला येत्या ८ मे पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.