मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी, मनपा शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयं, सुरक्षित पार्किंग, स्वयंरोजगार, कर प्रणाली, मोफत पाणी-वीज, १० रुपयांत जेवण, तरुणांसाठी सहाय्यता निधी, बेस्ट भाडे आदी सर्व समाजघटकांशी संबंधित घोषणांचा समावेश आहे. 

 

यामध्ये, लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर सुरु केल्या जाणाऱ्या स्वाभिमान निधी अंतर्गत मुंबईतल्या घरकाम करणाऱ्या महिलांना, तसंच कोळी महिलांना पंधराशे रुपये दिले जातील, सर्व शिक्षण मंडळांच्या शाळा सुरू केल्या जातील, त्यात मराठी भाषा अनिवार्य असेल. जिथं जिथं मुंबई महापालिकेचं पार्किंग आहे ते मोफत दिलं जाईल, ७०० चौरस फुटा पर्यतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला जाईल, मुंबईत क्लायमेट ऍक्शन प्लॅन राबवला जाईल. १०० युनिटपर्यत वीज मोफत, तर पाण्याचे दर स्थिर ठेवले जातील, प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार केले जातील, असं ठाकरे बंधूंनी जाहीर केलं. तपशीलवार निवडणूक जाहीरनामा येत्या दोन-तीन दिवसात जाहीर करु, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.