अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळते – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

सरकारची धोरणं, योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. ते आज मुंबईत राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्ताने विधान भवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. अंदाज समित्या या आर्थिक वाटप आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं पारदर्शकतेने निरीक्षण करतात, असंही बिरला यावेळी म्हणाले. यावेळी बिरला यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. अर्थसंकल्पीय अंदाजांची समीक्षा आणि पुनरावलोकनात अंदाज समितीची भूमिका हा या परिषदेचा मुख्य विषय आहे. या प्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

लोकशाहीत सरकारवर नियंत्रण ठेवणाऱ्या संसदेच काम हे अंदाज समित्यांमुळे अधिक प्रभावी होत असतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले. अंदाज समित्या केवळ अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर देखरेख ठेवत नाहीत, तर विभागांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी मदत करतात, असंही फडनवीस म्हणाले. तर अंदाज समित्या या लोकशाहीचा आत्मा असून त्या छोटेखानी कायदेमंडळाप्रमाणे काम करतात, असं प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केलं. अर्थसंकल्पीय आढावा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमतांसाठी त्या कार्य करतात, असंही ते यावेळी म्हणाले.

 

या राष्ट्रीय परिषदेत लोकसभा अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधिमंडळ समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर, देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे सदस्य आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य सहभागी झाले आहेत.