जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी वटवृक्षाचं रोप लावलं. ही मोहीम अरवली हरित भिंत प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पात सातशे किलोमीटरच्या अरवली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरण केलं जाणार आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी शेंदराची रोपं लावली. १९७१ च्या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या कच्छ आणि गुजरातमधल्या वीरांच्या माता आणि भगिनींनी ही रोपं प्रधानमंत्र्यांना त्यांच्या गुजरात दौऱ्यात भेट दिली होती.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत एक पेड माँ के नाम मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं.