डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आज जागतिक पर्यावरण दिन

देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेनं १९७३ मध्ये आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता. हा दिवस १४३ हून अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे साजरा केला जातो. ‘प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करा’ ही या वर्षीच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना आहे. 

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

 

पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगिकार करावा, असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात केलं आहे. 

 

वसुंधरेच्या कल्याणात मानवाचं हित सामावलेलं आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकानं पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावं, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी वटवृक्षाचं रोप लावलं. ही मोहीम  अरवली हरित भिंत प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पात सातशे किलोमीटरच्या अरवली पर्वतरांगांमध्ये पुनर्वनीकरण केलं जाणार आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी शेंदराची रोपं लावली. १९७१ च्या  युद्धात शौर्य गाजवणाऱ्या कच्छ आणि गुजरातमधल्या वीरांच्या माता आणि भगिनींनी ही रोपं प्रधानमंत्र्यांना त्यांच्या गुजरात दौऱ्यात भेट दिली होती. 

 

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत एक पेड माँ के नाम मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा