पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे किमान २० जणांचा मृत्यू झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. दार्जिलिंग, कुरेसाँग, मिरिक कालिंपाँग आणि सिक्किममधे जनजीवन विस्कळीत झालं असून एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रसरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत पुरवली जाईल असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.