विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. हे वर्ष भारतासाठी संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं.
२०२५ हे वर्ष भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं आणि सामर्थ्याचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भारताने जगाला दिला. दहशतवादी हल्ल्यांना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर, अण्वस्त्रांच्या धमकीला भीक न घालणं, दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांमधे फरक न करणं, तसंच सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य देणं ही धोरणं राबवून भारताने दहशतवादविरोधी लढा तीव्र केला.
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. एकाच दिवशी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही हे याद्वारे भारताने स्थापन केलं. गेल्या पाच दशकांतली पाकिस्तानच्या हद्दीतली ही भारताची पहिलीच मोठी लष्करी कारवाई होती. यात लष्करानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवादी तळांवर हल्ला करत शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. विशेष म्हणजे या कारवाईत स्वदेश निर्मित तंत्रज्ञानाचा आणि शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला, यामुळे जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन झालं.