December 28, 2025 8:05 PM | Viksit Bharat

printer

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारचे विविध उपक्रम

विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवले आहेत.  नव्या भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेली धोरणं पुढीलप्रमाणे…

 

भारताच्या विकासाच्या प्रवासात २०२५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरलं. रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुविधांमधे यावर्षी मोलाची भर पडली. दुर्गम भागापासून मोठ्या शहरांपर्यंत संपर्काचं जाळं तयार झालं. यात काही टप्पे हे ऐतिहासिक आहेत. मिझोराम हे ईशान्य भागातलं राज्य प्रथमच भारताच्या रेल्वेजाळ्याशी जोडलं गेलं. मिझोराममध्ये बांधला गेलेला बैराबी-सैरांग हा ५१ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग ८ हजार कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. यामुळे आता ऐझॉलसह अन्य भागात पिकणारा शेतमाल आणि अन्य सामग्रीची वाहतूक कमी खर्चात होणार आहे. याशिवाय उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पांतर्गत जगातला सर्वात उंच पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे काश्मीर खोरं उर्वरित देशाशी जोडलं जाणार आहे. याशिवाय बिहारमध्ये पहिली वंदे भारत रेल्वे, दिल्ली-मेरठ भागात जलद वाहतूक प्रणालीचं उद्घाटन असे काही महत्त्वाचे टप्पे यंदा गाठले. भारताचं मेट्रोजाळंही यंदा २४८ किलोमीटर वरून १ हजार १३ किलोमीटर पर्यंत वाढलं आहे. शहरी वाहतूक विस्ताराच्या गतीमुळे भारत आता जगातलं तिसरं सर्वात मोठं मेट्रो जाळं असलेला देश बनला आहे. देशातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याची लांबी मार्च २०१९मध्ये १ लाख ३२ हजार ४९९ किलोमीटर होती, ती यंदा १ लाख ४६ हजार ५६० किलोमीटरपर्यंत वाढली आहे. चौपदरी आणि त्यापेक्षा अधिक पदरी महामार्गांची लांबी ३१ हजार ६६ वरून ४३ हजार ५१२ किलोमीटर इतकी झाली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.