देशात होणारे शहरीकरण हा विकसीत भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू झालेल्या राष्ट्रीय शहर संमेलन २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
देशात होणारे शहरीकरण हे नागरिक केंद्रीत, सर्वसमावेशी आणि शाश्वत असावेत, असं मतही मनोहर लाल यांनी यावेळी व्यक्त केलं. गेल्या दशकांच्या तुलनेत शहरातील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. यातूनच स्वच्छ, आरोग्यदायी आणि समृद्ध शहरांची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं स्पष्ट होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या संमेलनात मनोहर लाल यांनी अमृत अँथम-जल ही जीवन, डंप साइट रिमेडिएशन अॅक्सेलटेर प्रोग्रॅम यांसारख्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचं उद्घाटन केलं. याचवेळी अर्बन इन्व्हेस्ट विंडो या प्लॅटफॉर्मचं उद्घाटनंही मनोहर लाल यांनी केलं. या माध्यमातून शहरी पायाभूत प्रकल्पांत सुलभपणे गुंतवणूक करता येणार आहे.