कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहा यांच्याविरोधातल्या एफआयआरची चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या तीन वरिष्ठ सदस्यांचं विशेष तपास पथक स्थापन करायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.
उद्या सकाळी १० वाजेपर्यंत हे पथक स्थापन करावं, या पथकातले अधिकारी मध्य प्रदेशातले नसावेत, तसंच यापैकी एक अधिकारी महिला असावी, असे निर्देशही न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या पीठानं दिले.
याप्रकरणी विजय शहा यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देश शरमिंदा आहे, अशी तोंडी टिप्पणी न्यायालयानं केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी २८ मे रोजी होईल.