उत्तराखंडमध्ये, चमोली जिल्ह्यातल्या नंदनगर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, कुंटरी लंगाफली प्रभागातली सहा घरं चिखलात गाडली गेल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत २ जणांचा बचाव करण्यात यश मिळालं असून, ७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असून, प्रशासन परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवत असल्याचं मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितलं.
आंध्रप्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, आणि कराईकल या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गोवा, मध्य महाराष्ट्र, ईशान्येकडची राज्य, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता असून, बिहार, जम्मू-काश्मीर-लडाख, झारखंड आणि ओदिशामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.