अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत औषधांच्या किंमती अधिक आहेत. औषधनिर्मितीसाठीचं संशोधन आणि विकास खर्चामुळे किमती अधिक ठेवाव्या लागतात, असं सांगून औषधनिर्मिती कंपन्यांनी गेली कित्येक वर्ष अमेरिकन लोकांची फसवणूक केली आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
मात्र आता नवीन धोरणानुसार अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या औषधांची किंमत इतर कोणत्याही देशाने त्याच औषधासाठी दिलेल्या सर्वात कमी किंमतीइतकी असेल. यामुळे देशातल्या नागरिकांचा आरोग्यसेवेचा खर्च कमी होईल, असं ट्रम्प यांनी सांगितलं. यामुळे मधुमेह आणि कर्करोगावरची औषधं देखील स्वस्त होणार आहेत.