सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या साडे चार वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृत काळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते. हा अर्थसंकल्प पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणार असून सरकारच्या विकसित भारत संकल्पनेचा पाया घालण्याचं काम याद्वारे होईल. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, देशात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे इथं संधीची विपुलता आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आपण जनतेला दिलेल्या हमीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचंही मोदी यांनी सांगितलं. 

मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधक आपलं अपयश झाकण्यासाठी संसदेतला वेळ खर्ची घालत आहेत. संसदेत आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधक करत असून लोकशाहीत असे प्रकार चालत नाहीत, असंही ते म्हणाले. 

सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या साडे चार वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. राजकीय पक्षांनी २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी राजकारण करावं, मात्र तोपर्यंत शेतकरी, युवक आणि देशाच्या सक्षमीकरणासाठी काम करावं असंही मोदी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.