ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे, जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. प्रदूषण,जैवविविधता आणि हवामानबदलाच्या आव्हानाला समोरं जाण्यासाठी आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली अंगिकारण्यासाठी सर्वांना पर्याय उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं जोशी म्हणाले.
ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरु करण्यापूर्वीच पर्याय उपलब्ध करुन देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी या वेबिनारमधे सांगितलं. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचा उल्लेख करुन त्यांनी सांगितलं की गेल्या १० वर्षात त्याचा उपयोग करणाऱ्यांची संख्या १० पटींनी वाढली आहे.