ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांची मुंबईत विविध उद्योजकांशी चर्चा

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या व्यापारी शिष्टमंडळानं आज मुंबईत देशातल्या विविध उद्योजकांची भेट घेतली.

 

भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आज मुंबईत उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले.  स्टार्मर यांनी आज यशराज फिल्म्स स्टुडिओलाही आज भेट दिली. पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या ३ चित्रपटांचं ब्रिटनमध्ये छायाचित्रण होणार आहे. यामुळं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत लाखो पौंडांची भर पडेल आणि ३ हजार रोजगार निर्माण होतील, असं स्टार्मर म्हणाले. 

 

राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी त्यांचं सकाळी विमानतळावर स्वागत केलं. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधल्या सव्वाशे उद्योजकांचं आतापर्यंतच सर्वात मोठं शिष्टमंडळ आहे. व्यवसाय सुलभतेच्या धोरणातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर सोडवण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ब्रिटीश शिष्टमंडळाला सांगितलं. उद्योजकांसाठी सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टार्मर उद्या मुंबईतल्या राजभवनात द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उद्योजकांशी चर्चा करतील.