जे देश रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करतात त्यांच्यावर शंभर टक्के वाढीव आयातशुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. रशिया युक्रेनबरोबरचं युद्ध संपवण्यात अपयशी ठरत असल्यानं आपण नाखूश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये ट्रंप यांची भेट घेतली. त्यानंतर ट्रंप बोलत होते. रशियानं युक्रेनबरोबर शांतता करार केला नाही, तर वाढीव आयातशुल्क लादण्यासाठी त्यांनी पन्नास दिवसांची मुदत जाहीर केली आहे. ट्रंप यांचा इशारा रशियासाठी असला, तरी त्याचा फटका रशियाकडून मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात करणाऱ्या भारताला बसणार आहे.