मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले. कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्याने हा अपघात झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, याकरता सर्व गाड्या १५ डब्यांच्या करणं, स्वयंचलित दरवाजे बसवणं अशा उपाययोजना करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तीन जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. तर कळव्याच्या रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार एका जखमीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. इतरांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आणखी तपशीलांची प्रतीक्षा आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.