प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि कृषी विभागात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने सुरु असलेल्या कामांचा अभ्यास करणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून काम पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत जमा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. फळबाग विमा योजनेंतर्गत ९० कोटी रुपयांचं वाटप नुकतंच झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांप्रमाणेच यावर्षी मच्छीमारांनाही सवलती देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.