शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रात सध्या १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मच्छिमारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. 

 

देशाच्या इतर भागातही मान्सून चा परतीचा प्रवास होत असतानाच पश्चिमी वाऱ्यांमुळे तसंच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला असून, अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे बिहारमधील १० जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे, तर पाटणा आणि अन्य पाच जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट लागू आहे. बिहारमधे सतत तीन दिवस पाऊस होत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 

उत्तर प्रदेशातही २७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणामध्ये आजपासून तीन दिवस पुन्हा पावसाची शक्यता असून, ८ ऑक्टोबरनंतर वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात घट होईल.

 

पंजाबमध्ये ११ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा, तर १३ जिल्ह्यांना पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. रावी, बियास आणि सतलज नद्यांवरील पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

 

मध्यप्रदेशातही मान्सून परतीच्या टप्प्यात असून, १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पूर्णपणे निघून जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांत अजून रिमझिम आणि हलका पाऊस सुरू राहील. जर प्रणाली मजबूत राहिली, तर काही भागांत पुन्हा मुसळधार पावसाचा अनुभव येऊ शकतो.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.