November 25, 2025 1:02 PM | narendra modi | PM

printer

अयोध्येतल्या श्रीराममंदिरात ध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येतल्या श्री राम मंदिरावर धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. राममंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे.

 

धर्मध्वजारोहणाच्या या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरी आज भारताच्या सांस्कृतिक जाणिवेच्या सर्वोच्च क्षणाची साक्षीदार बनली असून संपूर्ण देश आज राममय झाला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.

 

प्रधानमंत्र्यांनी सर्वांना धर्मध्वज सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसंच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं. प्रभु श्रीराम यांनी अयोध्येतून आपल्या जीवनाला सुरुवात केली. एक साधारण व्यक्ती मर्यादा पुरुषोत्तम बनू शकतो हे अयोध्येमुळेच समजलं. आदर्श मूल्यांना आचरणात आणण्याची शिकवण इथूनच मिळते असं प्रधानमंत्री म्हणाले.

 

रामाकडून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी देशाचा पाया भक्कम करण्याचा संकल्प यावेळी प्रधानमंत्र्यांनी केला. तसंच मेकॉलेने सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेत येत्या दहा वर्षात आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचा पुनरूच्चार केला.   यावेळी उत्तर प्रदेशच्या  राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतर मान्यवर आणि शेकडो भाविकजन उपस्थित होते.