महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७मधे सुरु होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. या प्रकल्पाचा ठाणे जिल्ह्यातला टप्पा २०२८ च्या दरम्यान पूर्ण होईल आणि त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातल्या टप्प्याचं काम सुरु होईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
या बुलेट ट्रेन मार्गावरच्या नवी मुंबईत घणसोली आणि शिळफाटा बोगद्याच्या जोडकामाचा आरंभ आज सकाळी वैष्णव यांच्या हस्ते झाला, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा सांगितलं. घणसोली ते शीळफाटा हा ४ पूर्णांक ९ दशांश किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू हा बीकेसी ते शीळफाटा या समुद्राखालून जाणाऱ्या एकवीस किलोमीटर बोगद्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये ठाणे खाडीतल्या ७ किलो मीटर भागाचाही समावेश आहे. नवीन ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धतीने या बोगद्याच्या ब्रेकथ्रूचं काम करण्यात आलं आहे असंही वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं.
बुलेट ट्रेन मुळे अहमदाबाद ते मुंबई प्रवासाचा वेळ २ तास ७ मिनिटांवर येईल. तसंच या मार्गावरच्या अनेक महत्त्वाची आर्थिक केंद्रं यामुळे जोडली जातील असा विश्वास, वैष्णव यांनी व्यक्त केला. यावेळी वैष्णव यांनी या नवीन बोगद्याच्या बांधकामाची पहाणी केली आणि कामाचा आढावा घेतला. बुलेट रेल्वेच्या कामात अनेक ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि सुटे भाग वापरले असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.