प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत घेणार भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत भेट घेतील. षण्मुगरत्नम राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करतील. राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी देखील देतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत सिंगापूरच्या अध्यक्षांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर, औद्योगिक उद्याने, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि व्यापार विकास या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात सांगितलं की, दोन्ही देश द्विपक्षीय संबंधांची 60 वर्षे साजरी करत असताना, सिंगापूरच्या अध्यक्षांच्या भेटीमुळे भारत-सिंगापूर व्यापक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल असा विश्वास आहे. अध्यक्ष थरमन पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मंत्री, संसद सदस्य आणि अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. सिंगापूरचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अध्यक्ष थरमन शुक्रवार आणि शनिवारी ओडिशालाही भेट देतील. भारत आणि सिंगापूरमध्ये मैत्री, विश्वास आणि परस्पर आदराच्या दीर्घ परंपरेवर आधारित व्यापक सहकार्य आहे. थरमन यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.