डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्‌’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्‌’ हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं. हे गीत म्हणजे भारतमातेप्रति भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे, जो आपल्याला इतिहासाशी जोडतो, वर्तमानात आत्मविश्वास निर्माण करतो आणि भविष्यासाठी नवसंजीवनी देतो,असंही ते म्हणाले.

 

‘वंदे मातरम्‌’ एकत्रितपणे गाणं हा शब्दांच्या पलीकडचा, हृदयाला स्पर्श करणारा अनुभव असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या गीताद्वारे स्वतंत्र, एकसंध आणि समृद्ध भारताचा नारा दिला होता, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित केलं. तसंच ‘vandemataram150.in’ हे विशेष पोर्टलही सुरू केलं. वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.