आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करावी ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत ते बोलत होते.
राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची उपलब्धता लक्षात घ्यावी. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केली तर या निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणं सहज शक्य होईल, असं ते म्हणाले.