प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे 7 हजार 160 कोटी रुपयांच्या बेंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचं उद्घाटन आणि 15 हजार 610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली. आरव्ही रोड, रागीगुड्डा ते बोम्मासंद्रा यांना जोडणाऱ्या या मेट्रो लाईन सह बेंगळुरूचं मेट्रो नेटवर्क 96 किलोमीटर हून जास्त झालं आहे. प्रमुख निवासी, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांदरम्यान सुलभ वाहतुकीसाठी बेंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात 44 किमीचा उन्नत मार्ग आणि 31 स्थानकं जोडली जाणार आहेत.
प्रधानमंत्र्यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या – बेंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर ते पुणे – यांना हिरवा झेंडा दाखवला. नागपूर ते पुणे मार्गावरील वंदे भारत रेल्वे च्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. विदर्भातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, परंतु सध्या प्रवाशांना महागडी तिकिटे खरेदी करावी लागतात आणि खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. शिवाय, अशा प्रवासाला जास्त वेळ लागतो. या बाबी लक्षात घेऊन, ही रेल्वे सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस असून या रेल्वेगाडीमुळे नागपूर ते पुणे हे अंतर सुमारे 12 तासांत पूर्ण करता येणार आहे.