डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो ३ चा अखेरचा टप्पा, आणि मुंबई १ ॲपचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लोकांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३ चा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा, तिकिट काढण्यासाठीचं मुंबई वन हे ॲप आणि आयटीआयमधल्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांनी आज नवी मुंबईतून केला.

 

८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते झालं. डिसेंबरपासून इथून उड्डाणं सुरू होतील. यामुळं २ आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं मुंबई हे देशातलं पहिलं महानगर झालं आहे. या विमानतळामुळं उद्योग धंद्याला चालना मिळेल, कृषी मालाला भाव मिळेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

 

यावेळी प्रधानमंत्र्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. भूमीगत मेट्रोच्या कामात अडथळे आणल्याबद्दल त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यासंदर्भातल्या माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. 

 

जीएसटीच्या दरकपातीमुळं यंदाच्या नवरात्रीमध्ये खरेदीचे विक्रम तुटले. त्यामुळं स्वदेशीवर जोर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना पुन्हा एकदा केलं. हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले. 

 

या विमानतळाच्या परिसरात तिसरी मुंबई आणि वाढवण परिसरात चौथी मुंबई उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण विमानतळ हे समुद्र किनाऱ्यावरचं देशातलं पहिलंच विमानतळ असेल. तसंच मुंबई मेट्रो ३ ही देशातली सर्वाधिक लांबीची मेट्रो असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांची या भाषणात केला. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं भूमीपूजन केलं होतं याची आठवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढली. तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मदत द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

 

या विमानतळामुळं देशातली अनेक ठिकाण मुंबई आणि नवी मुंबईशी जोडली जातील. वर्षाला ९ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता असलेलं हे विमानतळ २ लाख रोजगार निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला. येत्या २० वर्षात २ हजार नवीन विमानतळं उभारली जाणार आहेत. त्यात वाढवण विमानतळाचाही समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.