प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येत आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल. डिसेंबरपासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. मुंबई मेट्रो-३ चा आचार्य अत्रे मार्ग ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. यामुळं आरे कॉलनी, बीकेसी, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालय, विधानभवन मेट्रो मार्गिकेनं जोडले जाणार आहेत.
लोकल, मुंबई महानगर परिसरातल्या सर्व मेट्रो, मोनो, बेस्ट तसंच मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकिट एकाच अॅप वरुन काढता येणाऱ्या मुंबई वन अॅपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. विविध मेट्रो, बस, लोकल वगैरेंनी टप्प्याटप्प्याने नागरिकांना प्रवास करायचा असला तरी या सर्व प्रवासासाठी स्वतंत्र तिकिटाऐवजी एकच तिकीट या अॅपद्वारे काढता येईल. आयटीआय आणि तंत्रनिकेतन मधल्या लघु कालीन अभ्यासक्रमांनाही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.