प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार आहेत. ते ९ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिकच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत बांधलेल्या एक लाख घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमातही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. आदिवासी भागात ७४८ किलोमीटरच्या नव्या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजनही मोदी करणार आहेत. तसंच नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी सुरत इथं मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची पाहणी केली.