प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.
अक्रा इथल्या एनक्रुमा स्मारकालाही ते भेट देणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती दर्शवली. यादरम्यान, संस्कृती, मानकं, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधं या क्षेत्रांमधल्या चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
प्रधानमंत्री मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार Companion of the Order of the Star of Ghana या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्री येत्या ६ आणि ७ तारखेला रिओ दी जिनेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.