गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगाने विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केलं.
गेल्या काही काळांत अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख आणि भविष्यातल्या मोहिमांचा सूतोवाच करताना ते म्हणाले‘आर्यभट्ट ते गगनयान’ ही या वर्षीची या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना असून यात भूतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प आहे, असं ते म्हणाले. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत असून कृषी, मासेमारी, आपत्ती व्यवस्थापन, कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
गेल्या ११ वर्षांत अंतराळ क्षेत्रात केलेल्या विविध सुधारणांची माहिती त्यांनी दिली. या क्षेत्राची दारं खासगी क्षेत्रासाठी उघडल्यामुळे सध्या ३५० स्टार्टअप्स या क्षेत्रात काम करत आहेत, असं मोदी म्हणाले. पुढच्या ५ वर्षांत अंतराळ क्षेत्रातले ५ युनिकॉर्न उभारायचं आणि प्रत्येक वर्षी ५० रॉकेट्सचं प्रक्षेपण करायचं ध्येय ठेवावं, असं त्यांनी सुचवलं. त्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक सुधारणांची गरज असून त्या करायचा सरकारचा उद्देश आणि इच्छाशक्ती आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली.