संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरु केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरिक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं, असं सभापती बिरला यांनी सदस्यांना सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही सहकार्याचं आवाहन केलं पण गदारोळ चालूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सभपतींनी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतरही गदारोळ चालूच राहीला आणि कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेतही विरोधकांनी बिहारमधलं मतदार याद्याचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर स्थगनप्रस्तावाची नोटीस दिली होती. मात्र उपाध्यक्ष हरिवंश यांनी ती फेटाळल्याच्या निषेधात विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. गदारोळामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.