डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेश बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या बाबतीत घेतलेल्या कठोर धोरणाचा भाग म्हणून विविध पावलं उचलली आहेत. त्याअंतर्गत पाकिस्तानकडून आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेशबंदी आणि परस्पर टपाल बंदी आजपासून लागू झाली. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. 

 

पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या कोणत्याही जहाजाला भारतीय बंदरात प्रवेश बंद राहील असं बंदर, नौकानयन आणि जलमार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हा निर्णयही तात्काळ लागू झाला असून पुढच्या सूचनेपर्यंत लागू राहील. भारतीय नौकानयन उद्योगाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं   भारतीय जहाजांनी पाकिस्तानातल्या बंदरात जाऊ नये असं अधिसूचनेत म्हटलं आहे. 

 

पाकिस्तानातून हवाई, सागरी किंवा खुष्कीच्या मार्गाने टपाल आणि पार्सल आणणं दूरसंचार मंत्रालयाने थांबवलं असून पाकिस्तानात पाठवण्याचं टपाल किंवा पार्सलही जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं हे निर्णय घेण्यात आले असून त्यातून सूट अथवा सवलत हवी असल्यास वेगळी परवानगी मागावी लागेल, आणि त्या त्या प्रकरणातल्या परिस्थितीनुसार त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.