पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये सिमला इथे स्थानिक जनतेने दहशतवादाविरोधात आज निदर्शनं केली. सिमल्यातल्या व्यापाऱ्यांनीही अर्ध्या दिवसाचा बंद पाळत या घटनेचा निषेध केला आहे. खुंटी जिल्ह्यातही स्थानिक व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत एक दिवसाचा बंद पाळला. या हल्ल्याच्या निषेधार्थ खुंटी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मशाल रॅली काढण्यात आली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस समितीने येत्या २६ एप्रिल रोजी सिमल्यात आयोजित केलेली संविधान बचाओ रॅली स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आज दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं केली. या घटनेबद्दल देशातल्या जनतेच्या मनात संताप असून सरकारच आणि देशाचं सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सतीश उपाध्याय यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दिली.