केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नायब राज्यपाल मनोज सिन्हा , जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज श्रीनगरमध्ये पोलीस नियंत्रण कक्षात पहलगाम दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पुष्पांजंली अर्पण केली. यावेळी अमित शहा यांनी मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं. मृतांचं पार्थिव विशेष विमानानं श्रीनगरहून त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवलं जात आहे.
यानंतर गृहमंत्री पहलगामजवळ बैसरन इथं प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. ते हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा देखील आहेत. जखमींवर उपचार सुरू असलेल्या अनंतनाग इथल्या सरकारी रुग्णालयालाही भेट देऊन जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.
या हल्ल्यानंतर पहलगाम, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि लगतच्या कुलगाम आणि इतर दक्षिण काश्मीर भागातल्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली गेली आहे.
दरम्यान, या हल्ल्याचं वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल तातडीनं जम्मू काश्मीरला पोहोचले. त्यांनी श्रीनगर इथं राजभवनात उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करी कमांडर आणि विविध तपास संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.