डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी तीव्र निषेध नोंदवला असून, भारताला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक प्रमुख नेत्यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या, तसंच दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याची ग्वाही दिली.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीन रामगुलाम आणि नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्र्यांशी चर्चा करून हल्ल्याचा निषेध केला आणि मृतांबद्दल शोक व्यक्त केला. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के.पी. शर्मा यांच्याकडे शोक व्यक्त केला, तसंच या हल्ल्यातल्या पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्धताही व्यक्त केली. भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी. व्हान्स यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. भारताला आवश्यक असलेली सर्व मदत अमेरिका करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. 

 

याव्यतिरिक्त, ब्रिटनचे प्रधानमंत्री केअर स्टार्मर यांनी या हल्ल्याला विनाशकारी म्हटलं आहे, तर जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी या हल्ल्यातले जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, फ्रान्सचे प्रधानमंत्री इमॅन्यएल मॅक्रॉन यांनीही भारतासोबत खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला. गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या हल्ल्याला घृणास्पद कृत्य म्हटलं आहे, तर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. न्यूझीलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी तसंच युक्रेनच्या भारतातल्या  दूतावासानंही या हल्ल्याचा निषेध करत चिंता व्यक्त केली आहे.
बांग्लादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक महोम्मद युनुस तसंच बांग्लादेशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा