इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्धा निखत जरीनने काल महिलांच्या ५१ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत विजय मिळवला. वर्षभर दुखापतीमुळे बाहेर राहिलेल्या बिगरमानांकित निखतने जोरदार पुनरागमन करत ३२ व्या फेरीत अमेरिकेच्या जेनिफर लोझानोला ५-० ने हरवले. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जपानच्या युना निशिनाकाशी होईल. तर लव्हलिना बोर्गोहेनला तुर्कीच्या बुसरा इसिलदारकडून, संजूला पोलंडच्या अनेता
रायगिल्स्काकडूनही पराभव पत्करावा लागला. तर पुरुषांच्या लढतीत, हितेश गुलियाला नेदरलँड्सच्या फिन रॉबर्ट बॉसकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने २० सदस्यांचा संघ पाठवला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये ६५ हून अधिक देशांचे ५५० हून अधिक मुष्टियोद्धे सहभागी झाले आहेत.