मुंबई महानगर क्षेत्रासारखंच चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येतंय. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमधे भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपामधल्या इच्छुकांची एबी फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ लागली होती. एबी फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून दोन कोटी रुपये घेतले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला. याची चौकशी केली जाईल, असं महाजन यांनी सांगितलं. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकसाठी एकत्र आले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही मनसेसोबत एकत्र निवडणूक लढवत आहेत. मालेगावमधे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधे भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहेत. शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
नागपूरमधे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार असून भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसने जनविकास सेना पक्षाशी आघाडी केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले आहेत. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार आहेत.
कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झालं असून ८१ पैकी भाजपा ३६ जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना ३०, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा लढवणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे.
धुळे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची युती झाली आहे. तर भाजपा ६३ जागा स्वबळावर लढवणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस ३०, शिवसेना ३० आणि राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागा लढवणार आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीचीही अद्याप घोषणा झाली नाही. लातूरमध्येही भाजपानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपानं घेतला होता.
जालना महानगरपालिका निवडणुकीतही भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेे स्वबळाचा नारा दिला आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मात्र महायुतीच्या घटक पक्षांचं मनोमिलन झालं असून तिन्ही पक्षांनी युती जाहीर केली आहे.