December 30, 2025 1:57 PM | Municipal Corporation

printer

Maharashtra: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल

 

आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होईल.

 

दरम्यान, विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये पक्षांतर तसंच युती सारख्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत.जागा वाटपाच्या हालचालींनाही वेग आला आहे.

 

(मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार असं वाटप करण्यात आलं आहे. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  हा आपला विश्वासघात झाल्याची भावना त्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे. रिपाई ५० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं पक्षसूत्रांनी सांगितलं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष यापूर्वीच वेगळा झाला आहे. 

छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी काल पर्यंत शिवसेनेच्या वतीने ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झालं असून ८१ पैकी भाजपा ३६ जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेनेला ३० तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फुट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षानं तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळं कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहेत.

धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. तर महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे.)

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.