मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या पाच ते सात वर्षात मुंबई पूर्णपणे बदलण्याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित आयआयएमयूएन मुंबई-२०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवावर्गाशी संवाद साधला. यावेळी युवावर्गासाठीच्या अनेक योजना आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्र्यानी माहिती दिली. सध्या वांद्र ते वर्सोवा सागरी किनारी मार्ग, वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते भाईंदर मार्गांचं काम सुरू आहे. अटल सेतूला जोडण्यासाठी वरळीपासून शिवडीपर्यंत पूल तयार केला जात आहे. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी पाताललोक म्हणजे भुयारी मार्गांचं मोठं जाळं तयार करण्य़ात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे सर्व प्रकल्प २०३२ पर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी या कार्यक्रमता दिली.
मुख्यमंत्री इंटर्नशीप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाली, ही योजना राज्यात यशस्वी झाली , त्यामुळे इतर राज्यं सुद्धा ही योजना राबवत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.