मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या महिन्याच्या १० तारखेपर्यंत जम्मू-काश्मीर आणि पंजाब, तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातही मुसळधार पावसाची परिस्थिती राहणार आहे. तसंच, दक्षिण भारतात, आज कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागातही अतिमुसळधार पावसाची स्थिती असेल आणि उद्यापर्यंत केरळ, माहे आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची स्थिती असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, सुंदरबनच्या परिसरातल्या नद्या ओसंडून वाहत असल्यानं ब्लॉक आणि उपविभाग स्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्यात आला असून आज पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे.