मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात-धर्माचे उल्लेख झाल्याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर कारवाई करु – राज्य निवडणूक आयोग

मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात-धर्माचे उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केले आहेत. याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर संबंधितांना नोटिस पाठवू, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या तक्रारीप्रकरणी महापालिका आयुक्तांकडून अतिरिक्त व्हिडीओ मागवले आहेत. तसंच निवडणूक निरीक्षक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून अहवाल मागवला आहेत, असं त्यांनी सांगितलं.

 

या निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या ३४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी २८० तक्रारींवर कारवाई पूर्ण झाल्याचं वाघमारे म्हणाले. महापालिकांसाठी ३ हजार १९६ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या निवडणुकांमध्ये आतापर्यंत ७ कोटी रुपयांची रोख रक्कम, तर २ लाख ३६ हजार लीटर मद्य जप्त केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. सुमारे ५५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ९५ शस्त्रं जप्त केली, आणि २१ हजार ५०० हून अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. राज्यात एकंदर १० लाख ३२ हजार ५२१ दुबार मतदार असून त्यापैकी १ लाख २० हजार मुंबईत आहेत, असं ते म्हणाले.