मुंबईत पहिलं जेन झी टपाल कार्यालय सुरू होणार

अद्ययावत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं जेन झी टपाल कार्यालय मुंबईत सुरू होत असून आयआयटी मुंबई परिसरात उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे.

 

जेन झी अर्थात तरुण पिढीला टपाल सेवेकडे आकर्षित करण्यासाठी जेन झी टपाल कार्यालयाची संकल्पना देशभरात राबवली जात आहे. दिल्ली, केरळ, बिहार, गुजरात आणि आंध्रप्रदेशात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईत जेन झी टपाल कार्यालय सुरू होत आहे. मोफत वाय-फाय  सुविधा, कॅफेटेरिया, वाचनालय, संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिटल, क्यूआर आधारित सेवा वितरण, आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सोय देखील असेल.  तसंच या टपाल कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.

 

स्पीड पोस्ट सेवांवर दहा टक्के सवलत तर मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून टपाल कार्यालयाला एक सामुदायिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करणं हा यामागील हेतू आहे. महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह आणि भारतीय टपाल सेवेच्या टपाल सेवा संचालक केया अरोरा यांच्या हस्ते, आयआयटी मुंबईच्या कुलसचिवांच्या उपस्थितीत, उद्या या टपाल कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे.