मुंबईतल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या मुद्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं रखडल्याचं नमूद करत, खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेला गालबोट लागल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासनही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली. याबाबत विधासभेचे सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत सध्या चालू असलेली रस्त्यांची कामं रखडलेली असून, संपूर्ण शहर खोदून ठेवलं असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. याबाबत पराग अळवणी, अमित साटम, योगेश सागर, आदित्य ठाकरे, अमित देशमुख, वरुण सरदेसाई या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारलेल्या होर्डिंग्जच्या प्रकरणातही कठोर कारवाई करत, जबाबदार कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना दिलं.
दरम्यान, आज प्रश्नोत्तराला सुरुवात झाली तेव्हा उत्तरं देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नव्हते, त्याबद्दल दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं, त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झालं.