कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आज नवी दिल्ली इथं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबतचं निवेदन सादर केलं. उपनगरी रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवांचा दर्जा सुधारावा, या आणि इतर मागण्यांचा यात समावेश आहे.
महिलांसाठी विशेष लोकल सेवा, स्वच्छ प्रसाधनगृहं, कमी गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत, ठाणे जिल्ह्यातल्या सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या. या मागण्यांची दखल घेत, रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऍक्शन प्लान तयार करणार असल्याचं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं.