सदनिका घोटाळा प्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज अटक वॉरंट जारी केलं. कोकाटे रुग्णालयात दाखल असल्यानं अटक पुढे ढकलण्याची विनंती करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला, तसंच काल या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल कोकाटे यांच्यावर ताशेरे ओढले.
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या पीठाकडे केली, मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.
न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही, त्यामुळं कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याच्या संदर्भात निर्णय झालेला नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. याप्रकरणी कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हे अजित पवार ठरवतील, असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं.
न्यायाधीश पी. एम. बदर यांनी काल माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षं सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली होती.