जीएसटी सुधारणेमुळे देशाच्या जीडीपीत २० लाख कोटी रुपयांची भर पडणार असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. हा मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
गेल्या अकरा वर्षांत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात ६ पट वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक क्षेत्र हे देशातलं अव्वल दर्जाचं क्षेत्र म्हणून उदयाला येत असल्याचं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. गेल्या दशकभरात इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्यातीत आठपट वाढ झाली असून या क्षेत्रामुळे २५ लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळाल्याचं ते म्हणाले. आवश्यक असलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूचं उत्पादन आता देशात केलं जात आहे, असं वैष्णव यांनी सांगितलं.